सन २०२२ च्या सततच्या पावसाने झालेले शेतीपिकांची नुकसानभरपाई आणि पावसाचा खंड पडल्याने पीक विम्याची २५ % रक्कम त्वरित अदा करा….
आमदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकारी अमरावती आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती यांचेकडे मागणीसन २०२२ च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि फळपिकांच्या नुकसानाकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून संदर्भीय शासन निर्णयानुसार मदत जाहीर करण्यात आली. त्याअनुषंघाने अमरावती जिल्ह्याला रुपये १२९,५७,३६,०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला. संदर्भीय पत्र क्रमांक २ नुसार दर्यापूर तालुक्याला रु. १७.७१/- कोटी , अंजनगाव सुर्जी तालुक्याला रु. १९.३९/- कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला. सदर नुकसान भरपाईचे संयुक्त सर्वेक्षण तलाठी , कृषी सहायक , व ग्रामसेवकांमार्फत करण्यात आले होते. यात काही मंडळात तलाठी मार्फत शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या आणि उर्वरित मंडळात ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांमार्फत संयुक्तरित्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या.
दोन्ही तालुक्यातील तलाठीमार्फत तयार करण्यात आलेल्या यादीमधील शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळालेली नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु ग्रामसेवक आणि कृषी संघटनेने सदर निधी वाटपावर बहिष्कार टाकल्याने अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. याबाबत तातडीने शेतीपिकांच्या आणि फळपिकांच्या नुकसानाकरिता शेतकऱ्यांना शासनामार्फत आलेले अनुदान तातडीने देणेबाबत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतभाऊ वानखडे यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली.
तसेच अमरावती जिल्ह्यात झालेल्या यावर्षीच्या सरासरी पावसाच्या तुलनेत दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामात मान्सूनच्या तीन आठवड्याचा विलंब झाल्याने पेरण्या लांबल्या होत्या तसेच २४ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड राहिल्याने पिकांची वाढ खुंटली असून सरासरी उत्पन्नावर ५० टक्क्यांवर परिणाम झाला आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात माहे जुलै ते ऑगस्ट या महिन्यात पावसाचा २१ दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिकांच्या वाढीवर तसेच संभ्याव उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात पावसाचा २१ दिवसापेक्षा जास्त खंड असल्यास तातडीची नुकसान भरपाई म्हणून नुकसानभरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम दिल्या जाते. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात पावसाचा २१ दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे , सोयाबीन , तूर , कपाशी , मुंग , उडीद , व अन्य खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या दोन्ही तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी , विमा कंपनीचे अधिकारी , तसेच प्रादेशिक संशोधन केंद्राच्या कृषी शास्त्रज्ञामार्फत सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची तसेच पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्याने एस. डी. आर.एफ. आणि एन.डी. आर. एफ. च्या निकषानुसार सरसकट नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्याना दिलासा देण्याची मागणी जिल्हाधिकारी अमरावती तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अमरावती यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली. यावेळी पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करून नुकसानभरपाईची तसेच पीक विम्याच्या २५% अग्रीम देण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अमरावती यांनी आश्वासित केले.
याबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांनी पावसाच्या खंडामुळे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीची नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या दृष्टीने मंडळ कृषी अधिकारी , विमा कंपनी प्रतिनिधी , कृषी सहायक यांची तालुकास्तरीय संयुक्त समिती ची नेमणूक केली असून नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेशित केले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)