परिवर्तन चा सहकार ला ‘जोर का धक्का’
बच्चू कडू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बँकेचे नवे अध्यक्ष
१७ वर्षानंतर काँग्रेसचे राज समाप्त
महेन्द्र भगत सह संपादक अंजनगाव एक्सप्रेस न्यूज
जिल्ह्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणार्या जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून आज माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार अभिजीत ढेपे हे अनपेक्षितपणे निवडून आले. काँग्रेससाठी सर्व परिस्थिती अनुकूल असतांना हा निकाल आलाच कसा या विचाराने अनेक जण बुचकळ्यात पडले आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आता अध्यक्षपदी निवड झालीय. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांच्या मदतीने चांगलीच फिल्डिंग लावली होती. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
राज्याच्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांचेच अध्यक्ष व उपाध्यक्ष जिल्हा बँकेवर निवडून येतील, अशीच परिस्थितीत होती. अध्यक्षपदासाठी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते आणि उपाध्यक्षपदासाठी ठाकूर यांचे समर्थक हरिभाऊ मोहोड यांचीच वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा होती. पण आज झाले भलतेच. हा निकाल म्हणजे आमदार ठाकूर यांना मोठा धक्का मानला जात आहे.
अमरामती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी आमदार बच्चू कडू तर उपाध्यक्ष पदासाठी अभिजीत ढेपे यांनी अर्ज भरला होता. अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासह काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार फील्डिंग लावल्याची माहिती मिळत होती. अखेर या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी निवड झाली
बबलू देशमुख तसेच अॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे निश्चित करण्यास फारसे कठीण जाणार नाही, असे अन्य संचालकांचे मत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दीड वर्षासाठी सुधाकर भारसाकळे यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. दीड वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.
काय घडले ?
आमदार बच्चू कडू यांनी आज (ता. २४) सकाळी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. तेव्हाच रात्रीतून काहीतरी शिजल्याचा संशय यायला लागला. उपाध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अभिजित ढेपे यांनी अर्ज भरला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस होणार, हे तेव्हाच सर्वांच्या लक्षात आले होते. पण नेमके काय, हे मात्र कळायला मार्ग नव्हता.
*काँगेसची फुटलेली ती तीन मते कुणाची ?*
या निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्याकडे संचालकांची आवश्यक संख्या नव्हती. तरीही त्यांनी सकाळी अर्ज दाखल केल्यामुळे ठाकूर गटात शंकेची पाल चुकचुकली होती. तेव्हापासून या निवडणूक चुरस वाढली होती. रविवारी (ता. २३) रात्रीतून चक्र फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता काँग्रेसची फुटलेली ती तीन मते कुणाची, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हा दडपशाहीच्या विरोधातला विजय’-बच्चू कडू
बच्चू कडू यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिलीय. हा दडपशाहीच्या विरोधातला विजय आहे. शेतकर्यांना या बँकेतून कर्ज मिळावं यासाठी उपोषण करावं लागलं. त्याचा हा बदला निघाला आहे. आपल्या कार्यकर्त्याला वाईट वागणूक दिल्याने त्याचे परिणाम काय भेटतात याचा रिझल्ट आहे. आम्ही कडू जरी असलो तरी गोड बोलतो हे या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर दिली.