अंजनगाव सुर्जी तालुका अभयारण्य म्हणून घोषित करा

अंजनगाव सुर्जी तालुका अभयारण्य म्हणून घोषित करा

पक्षीमित्र अरुण शेवाणे यांची वनमंत्र्या कडे निवेदनाद्वारे मागणी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा दोन बछड्यांसह बिबट्याचे मुक्त संचार पहावयास मिळाले असुन मातीच्या कणातून अन्न निर्माण करणारा शेतकरी वन्य प्राण्यांच्या कचाट्यात सापडला आहे. याकडे वनविभाग व सरकारचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देण्यात तर सरकार असमर्थ ठरलं पण, जे घाम गाळून कष्ट करून पीक उगवल्या जाते त्यावर सुद्धा शेतकऱ्यांचा अधिकार राहिला नाही. पिकाला वन्य प्राणी कधी नष्ट करतील याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मूग, उडीद, कपाशी , सोयाबीन, मिरची, हरभरा व यासारखे इतर पिकांचे अतोनात नुकसान वन्यप्राणी करत असल्याने काही शेतकऱ्यांनी पीक पेरणी सोडली आहे. मात्र वनविभागाला यावर कुठलीही कारवाई व उपाययोजना करण्याचे अजिबात रस नसल्याचे दिसून येते. पिक विमा काढण्याकरिता सरकार जाहिरात बाजी करते त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनी व सरकार ला रस दिसत नाही.
चिखलदरा , मेळघाट अभयारण्यात ( हिंसक प्राणी सोडून ) जेवढे प्राणी नसतील त्याच्या १०० पट प्राणी अंजनगाव सुर्जी तालुक्यात आहेत, त्यामध्ये हरिण,काळवीट, माकडे ,रानडुकरे, रोही या प्राण्यांचा मोठा समावेश आहे. सर्व अभयारण्यातील प्राणी राजरोसपणे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चरत असतात या गोष्टीकडे वनविभागाचे अजिबात लक्ष नाही. नुकसानापोटी वनविभाग देत असलेल्या तोडग्या रक्कमेत शेतकऱ्यांच्या बियाणांचा खर्च सुद्धा निघत नाही. वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानापोटी मिळणाऱ्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात यावी. अन्यथा वन्य प्राण्यांना व हिंसक प्राण्यांना पकडून घेऊन जावे किंवा अंजनगाव सुर्जी तालुका हा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात यावा. अशी मागणी पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या जंगलात बिबट्या सारखे प्राणी वारंवार दिसत असतात तेव्हा तो जंगल अभयारण्य म्हणून ओळखले जाते. अगदी तसेच अंजनगाव तालुक्यात चिंचोली शिंगणे , कसबेगव्हान, जवळा बु. घोडसगाव, एकलारा या भागात भुलेश्वरी नदीपात्रात मागील एक महिन्यापासून मादी बिबट आणि तिच्या दोन बछड्यांचा मुक्त संचार असून १८ जुन २०२३ रोजी एकलारा आणि चिंचोली शिंगणे येथीलदोन शेतकऱ्यांवर शेतात काम करत असताना सदर बिबट्याने प्राण घातक हल्ला देखील केला होता. सदर बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश येत आहे.सद्यस्थितीत शेतकरी शेतमजूर शेतीच्या कामानिमित्त शेतात असल्याने त्यांच्यात दहशत निर्माण झाली आहे. आणि अशा प्रकारची दहशत ही फक्त अभयारण्यातच पहावयास मिळते. म्हणून अंजनगाव सुर्जी तालुक्याला अभयारण्य म्हणून घोषित करण्याची योग्य वेळ आलेली आहे. हिंसक प्राण्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे अंजनगाव तालुक्यातील शेतीला जंगलाचे स्वरूप आलेले आहे. म्हणून अंजनगाव सुर्जी तालुका हा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात यावा व अभयारण्य चे नियम लागू करण्यात यावे अशी मागणी पक्षीमित्र व शेतकरी अरुण शेवाणे, प्रतीक मळसणे, प्रशांत सरदार, प्रदीप सातवटे, कमलकिशोर शेंडे, संजय हिंगे, यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]