गेवराई मतदार संघात एकाच म्यानात दोन तलवारी
आ.पवारांवर कोण ? ठरणार भारी
पंडितांच्या आमदारकीचे स्वप्न स्वप्नच राहणार का ?
गेवराई/प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी थेट भाजपा सेनेसोबत संसार थाटून सरकारमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या प्रवेशाने अनेकांना धक्का बसला. स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघातसुद्धा याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गेवराईमध्ये प्रामुख्याने विधानसभेला पवार विरुद्ध पंडित आणि पंडित विरुद्ध पंडित असा सामना पाहावयास मिळतो. परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गेल्याने आता आ.अॅड.लक्ष्मण पवार विरुद्ध माजी आ. बदामराव पंडित यांच्यात लढाई पाहावयास मिळणार आहे. कारण महायुती झाल्याने माजी आ. अमरसिंह पंडित यांची निवडणुक लढविण्याची संधी हुकणार आहे. एका म्यानात दोन तलवारी (आ.पवार आणि अमरसिंह पंडित) बसणार असल्याने बदामरावांना आयती संधी चालून आली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर अमरसिंह पंडित युती धर्म पाळणार की बंडाचे निशाण फडकवणार हे आज सांगणे अवघड आहे. किमान सध्या तरी अमरसिंह पंडितांची मात्र पंचाईत झाली आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघ हा सातत्याने आमदार बदलणारा मतदारसंघ आहे. गेल्या तीस वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीचा आढावा घेतला तर या ठिकाणी 1995 व 1999 साली माजी मंत्री बदामराव पंडित यांना मतदारांनी स्वीकारले आहे. तर 2004 साली याठिकाणी अमरसिंह पंडित यांना संधी दिलेली आहे. पुन्हा 2009 साली बदामराव पंडित यांना मतदारांनी डोक्यावर घेतलेले आहे. त्यानंतर मात्र 2014 व 2019 या निवडणुकीत अॅड.लक्ष्मण पवार हे सलग दोन वेळा आमदार झाले. या दोन्ही निवडणुकांमध्ये पंडित विरुद्ध पंडित लढल्याने त्याचा थेट फायदा अॅड.लक्ष्मण पवार यांना झालेला आहे. मध्यंतरी अमरसिंह पंडित हे विधानपरिषदेवर सुद्धा गेले होते. आता सध्यातरी निवडणुकीचे चित्र बदलल्याचे दिसत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेटपणे सहभागी झाल्याने अनेकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यांनी गेली चार वर्षे मतदारसंघामध्ये फिरुन वाडी तांडावर जावून लोकांना मदत केली यावर करोडो रुपये खर्च झाले आता अशा दावेदारांवर हात चोळण्याची वेळ आणली आहे. एका क्षणात आमदार पदाच्या दावेदारांना बाजूला सारण्याचे पाप देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी ( त्यांना जेलमध्ये जाऊ किंवा इडीने गुन्हा दाखल करू नये म्हणून ) केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या प्रवेशाने पेच निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी भाजपाचा विद्यमान आमदार आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीला हात चोळावे लागणार आहेत. तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्या ठिकाणी भाजपाला शांततेची भुमिका घ्यावी लागणार आहे. हे असे शमणार आहे का? आणखी काही महाराष्ट्राच्या वाट्याला वाढून ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस यांना कसल्याही पद्धतीत विरोधक आणि विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही. सर्व काही आपल्या बाजूने वळते करुन महाराष्ट्रावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्याची निती आहे. परंतु त्यांच्या नितीला झुगारण्याचे काम आणि बंड करण्याचे काम आजचे मित्र आणि मित्रपक्ष करु शकतात. हेही टाळता येणे शक्य नाही. गेवराई विधानसभा मतदार संघात सातत्याने बदलत होत आलेला आहे. गेल्या तीस वर्षाचा आढावा आणि अभ्यास केला तर तीन वेळा बदामराव पंडित, दोन वेळा अॅड.लक्ष्मण पवार आणि एक वेळा अमरसिंह पंडित विधानसभेवर निवडुन गेले आहेत. परंतु काल पर्यंत तगडी फाईट गेवराई मतदारसंघात दिसत होती. परंतु हा संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नात आणि एक दुश्मन कमी करण्याच्या नादात देवेंद्र फडणवींसानी ईडीच्या सहकार्याने अजितदादा पवार व त्यांच्या सहकार्यांना सोबत घेवून सरकार स्थापन केले. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावरसुद्धा परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. कारण अजित पवारांचे भाजपला समर्थन ही धक्कादायक बातमी होती. परंतु वास्तवसुद्धा तसेच होते. या आव्हानाला मतदार कशा पद्धतीने तोंड देणार आहेत हे येणार्या काळात स्पष्ट होईल परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट सांगितले आहे की, आम्ही आता यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील निर्णय अंतिम मानला जाईल म्हणजेच स्थानिकला महायुती राहणार नाही आपापल्या परिने निवडणुका लढवा आणि लाठयाकाठ्या द्या आणि घ्या अशी निती दिसते आहे. महायुतीचा परिणाम गेवराई विधानसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमरसिंह पंडित यांनी यावेळी अॅड.लक्ष्मण पवारांना धूळ चारण्याचा निर्धार केला होता. तशी तयारी जोरदारपणे सुरु होती. गेल्यावेळी अमरसिंह पंडितांनी निवडणुकीमध्ये स्वतः न उभारता त्यांचे बंधू विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देवून पूर्ण ताकद उभी केली होती. परंतु बदामराव पंडित यांच्यामुळे तेही शक्य झाले नाही. दोन वेळा पवारांकडून पंडितांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरी देखील हार न मानता पवारांना पायउतार करण्याची रणनिती करण्यात आली होती. महायुती झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. अमरसिंह पंडित यांना थेटपणे अॅड.लक्ष्मण पवार यांची पालखी वाहवी लागणार आहे. कारण त्या ठिकाणी विद्यमान आमदार हे भाजपचे असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना मदत करणार आहे. बदामराव पंडित यांना ही आयती संधी चालून आली आहे. बदामराव पंडित हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुक लढविणार आहेत. त्यामुळे पंडित विरुद्ध पंडित असा सामना होणार नाही त्यामुळे सर्व पंडित एकत्र येवून पंडितांचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न करतील पण आजच्या स्थितीला अमरसिंह पंडित किंवा त्यांच्या कुटूंबातील कोणीही विधानसभेला उमेदवार नसतील हे खरे आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बरेच चित्र स्पष्ट होईल अजितदादा पवार लोकसभा निवडणुकीनंतर काय भुमिका घेतात किंवा भाजपाचे वर्तन अजितदादांसोबत कसे राहते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आजच्या स्थितीला ज्या पद्धतीने शिंदे गटाला वागवले जात आहे. तसे गरज संपल्यानंतर भाजप व फडणवीस अजितदादानां व त्यांच्या समर्थकांना वागवणार नाही कशावरुन ? असा सवाल उपस्थित होत आहे. गेवराईमध्ये यावेळी मोठी रंजक लढाई पाहवयास मिळणार आहे. याची उत्सुकता गेवराईकरांना आहे.
परमेश्वर गित्ते,
संपादक दैनिक वार्ता,
अंबाजोगाई जि. बीड
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)