अस्थिर परळी; मतदारांच्या डोक्याचे झाले दही अनेकांना वाटते बहिण भाऊ सत्तेत असावेत

अस्थिर परळी; मतदारांच्या डोक्याचे झाले दही
अनेकांना वाटते बहिण भाऊ सत्तेत असावेत

परळी/प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. परळी विधानसभा मतदार संघ हा राज्यातील लक्षवेधी मतदारसंघ आहे. परंतु या ठिकाणी मतदारांमध्ये व राजकीय क्षेत्रात अस्थस्वता दिसून येत आहे. या परिस्थितीने मतदारांच्या डोक्याचे दही झाले आहे. कारण कालपर्यंत एकमेकांना शिव्या घालणारे आणि पाण्यात पाहणारे एकत्र येत आहेत. मतदारांनी एकमेकांची डोकी फोडली. वेळप्रसंगी गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतले. त्या मतदारांचा कोणी कसा विचार करत नाही. हे यावर सिद्ध झाले. जे नेते मतदारांचा विचार करत नाहीत त्यांना आपण कुठल्या पद्धतीने मदत करावी हा प्रश्न परळीच्या मतदारांसमोर उभा टाकला आहे. परळीकरांच्या डोक्याचे दही झाले असून काय निर्णय घ्यावा याच्याबद्दल उकल केलेली नाही. उलट जशी परिस्थिती येईल त्या प्रमाणे निर्णय घेवू अशी भावना व्यक्त केली आहे. परंतु अनेकांच्या मते दोन्ही बहिण भावांनी एकत्र येवून जिल्ह्याचे नेतृत्व करावे अशी भावना आहे. पंकजाताईंनी लोकसभा तर ना.धनंजय मुंडे यांनी विधानसभा लढवावी अशी अनेकांची मागणी आणि अपेक्षा आहे. भाजपाकडून आणि विशेषतः पंकजाताईंनी तर दोन महिन्याचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे पंकजाताईंचे मतदार शांततेच्या भुमिकेत आहेत. आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कशी परिस्थिती राहिल याबद्दल अनेक तर्कवितर्क आहेत.
महाराष्ट्रात सर्वात हॉट आणि लक्षवेधी मतदारसंघ म्हणून परळी मतदारसंघाकडे पाहिले जाते. या ठिकाणी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी तशी मतदारसंघाची पेरणी केली होती. त्यांच्यानंतर मतदारसंघाची सुत्रे पंकजाताई मुंडे यांच्याकडे आली. 2009 व 2014 या दोन टर्ममध्ये पंकजाताई आमदार झाल्या. मंत्री झाल्यानंतर जनसंपर्क कमी झाला आणि सामान्य माणसापासून त्या दूरावल्याने आणि स्थानिक यंत्रणेच्या कुचकामी पणामुळे त्यांना 2019 साली पराभवाचे तोंड पाहावे लागेल. ना.धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंची नकारात्मक भुमिका स्वतःच्या विजयात परावर्तीत केली. गेल्या चार वर्षापासून ना.धनंजय मुंडे यांनी मतदारसंघावर चांगली पकड निर्माण केली. सुरुवातीची दोन वर्ष मंत्रीपदाच्या काळात आणि विशेषतः कोरोनाच्या काळात चांगले काम उभे करुन मतदारांची सहानुभुती मिळविली. तर पंकजाताई या 12 डिसेंबर 3 जून, दसरा मेळावा आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारसंघात येत होत्या. एकमेकांचे प्रतिस्पर्धी आणि विरोधक म्हणून दोघांचीही कामगिरी चांगल्या प्रमाणे राहिली थोड्याबहुत प्रमाणात पंकजाताई मागे होत्या परंतु ना.धनंजय मुंडे हे आमदार असल्याने सातत्याने मतदारांच्या संपर्कात होते. ना.अजितदादा पवार यांच्या निर्णयाने या मतदारसंघातील चित्र पूर्णतः बदलले आहे. ना.धनंजय मुंडे हे सत्तेत आल्याने त्यांचे समर्थक कमालीचे खूष आहेत. कारण गेल्या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये सत्तेपासून दूर राहिल्याने प्रशासनावरील प्रभाव कमी झाला होता. परंतु पुन्हा एकदा मंत्री झाल्याने तो प्रभाव पुन्हा दिसून येणार आहे. तर इकडे पंकजाताई समर्थकांनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु दोन्ही नेते एकत्र येवून जर पंकजाताई लोकसभा आणि ना.धनंजय मुंडे विधानसभेला राहिले तर आनंदच असेल अशी भावना व्यक्त केलेली आहे. आजच्या स्थितीला पंकजाताई मुंडे यांनी कसलीही भुमिका जाहिर केलेली नाही परंतु पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना खंत व्यक्त करत फोडाफोडीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. असे सांगून बोलणे टाळले. त्यांनी आपल्या मनातील जी काही भावना आहे ती व्यक्त करत आपण दोन महिने विश्रांती घेणार आहोत आणि आजच्या राजकारणाला कंटाळलो आहोत अशी भावना व्यक्त केली. त्यावरुन आजतरी त्यांच्या मनाला हे फोडाफोडीचे राजकारण पटलेले नाही. मतदारसंघात पूर्णतः अस्थिरता निर्माण झाली आहे. परळी मतदारसंघात आगामी काळात कमालीची चुरस दिसेल अशी शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे दोन उमेदवार तसेच शिवसेनेचा एक उमेदवार आणि इतर उमेदवार असतील त्यामुळे मतविभागणी होवून त्याचा फटका कोणाला बसेल हे सांगता येत नाही. परंतु ज्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क ज्या पक्षावर, ज्या विचारावर आणि नेतृत्वावर दाखविला होता तो विचार पायदळी तुडवत नेतृत्वांनी घेतलेली भुमिका ही मतदारांची प्रतारणा नाही का? असा सवाल व्यक्त होत आहे. ना.धनंजय मुंडे मंत्री झाले याचा आनंद सर्वांना आहे. परंतु ज्या पद्धतीने झाले त्याबद्दल मनात नाराजी आहे. ज्या दलित व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या हितासाठी आणि भविष्यासाठी राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्ष आहे म्हणून मतदान केले. त्या मतदारांच्या सुरक्षिततेचे काय असा प्रश्न निर्माण होतो. मतदारांमध्ये पूर्णतः अस्थवस्ता आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांच्याकडून प्रतारणा होत आहे अशी भावना निर्माण झाली आहे.. विशेष म्हणजे निवडणुकांच्या काळांमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी एकमेकांच्या विरोधात लढले, संघर्ष केला वेळप्रसंगी स्वतःच्या अंगावर काठ्या घेतल्या आणि गुन्हे दाखल करुन घेतले. काही वेळा तर विनयभंग, दरोडा या सारखे गंभीर प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल झाले. एवढे सारे होवून जर नेते आणि पक्ष एकमेकांच्या शेजारी बसून महाराष्ट्राची फसवणुक करणार असतील तर मतदारांनी प्रक्रियेच्या बाहेर राहणे पसंत केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शिवाय पंकजाताईंनी दोन महिन्याची विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पंकजाताई जेव्हा सक्रिय होतील त्याचवेळी त्यांची भुमिका आणि निर्णय घेऊ असे परळीकरांनी सांगितले आहे. ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे परळी मतदारसंघाला पुन्हा विकासासाठी संधी मिळाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आज ना. मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. परंतु ना. धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचे कौतुक पंकजाताई समर्थकांना आहे का ? हे उमगू शकलेले नाही. विधानसभा निवडणुका कश्या पद्धतीने होतील हे आज स्पष्ट नाही.लोकसभा निवडणुकीनंतरच राज्याचे चित्र स्पष्ट होईल.आज राष्ट्रवादीची गरज भाजपला आहे म्हणून सोबत घेतले आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बरेच चित्र स्पष्ट होईल.
परमेश्वर गित्ते,
संपादक दैनिक वार्ता,
अंबाजोगाई जि. बीड

Spread the love
[democracy id="1"]