वारकऱ्याचा कुंभमेळा पंढरीची वारी.

वारकऱ्याचा कुंभमेळा पंढरीची वारी.

भागवताचार्य ज्ञानेश्वरजी महाराज वाघ ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड

बाळासाहेब नेरकर कडून

भारतीय आध्यात्मिक सारस्वता मध्ये कुंभमेळ्याचे महत्त्व विशद केलेले आहे . तो दर बारा वर्षांनी हरिद्वार , प्रयागराज , उज्जैन व नाशिक या तीर्थक्षेत्रांमध्ये भरत असतो . तिथे अखिल विश्वातून लाखो भाविक स्नानासाठी येतात हे सर्वश्रुत आहे . तद्वत द्वादश वर्षांनी नव्हे तर वर्षातून द्वादश वेळा अर्थातच प्रतिमासिक शुद्ध एकादशीला वारकऱ्यांचा कुंभमेळा महायोगपीठ पंढरीक्षेत्रात भरत असतो . त्यातही आषाढी वारी हा महाकुंभमेळाच असून ; यात प्रतिवर्षी लाखोभाविक सहभाग घेतात . संत श्री ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक साधुसंतांच्या पालख्यांचे सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या सीमावर्ती राज्यातून वारकरी पायी चालत येत असतो . कायिक , वाचक व मानसिक हे त्रितपाची अहोरात्र साधना करीत असतात. अर्थात अष्टोप्रहर भजनाच्या द्वारा वाचक तसेच अहोरात्र भगवत चिंतनाचा द्वारा मानसिक तर आणि पायी चालून कायिक असे त्रिविध तप गीतोक्त तत्त्वज्ञानानुसार तो करत असतो . तसेच कीर्तन – प्रवचन श्रवणाच्या द्वारा व चंद्रभागेच्या पवित्र जल स्नानाने आपली अंतर्बाह्य शुद्धी करून घेत असतो .
भारत देश अनेक पवित्र नद्यांनी परिपूर्ण आहे. त्यात चहु दिशांना चारो धाम आहेत ; तर दिशात्रयांना नदीपती समुद्र आहे . उत्तर दिशेला उत्तंग पर्वतराज हिमालय आहे . द्वादश ज्योतिर्लिंग आणि सप्तपुऱ्या व अष्टविनायकादी अनेक महान पवित्र तीर्थक्षेत्र आहेत .
” पावन पांडुरंग क्षिति l
जे का दक्षिण द्वारावती l
जेथे विराजे विठ्ठल मूर्ती l
नामे गरजा ती पंढरी ll”
दक्षिण द्वारका पंढरी l
शोभतसे भीमातीरी ll
उपरोक्त शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांच्या वचनानुसार दक्षिण द्वारावती म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे नुसतेच तीर्थक्षेत्र नसून ; ते साधू संतांसह अखिल मानव मात्रांचे माहेरघर आहे
” पंढरीये माझे माहेर साजणी l ओव्या कांडणी गाऊ गीती ll
राही रखुमाई सत्यभामा माता l पांडुरंग पिता माहेरी ये ll ” तसेच ” माझे माहेर पंढरी l
आहे भिवरेच्या तीरी ll
बाप आणि आई l
माझी विठ्ठल रखुमाई ll
माहेर संतांचे l नामया स्वामी केशवाचे ll
जाईन गे माये तया पंढरपुरा l भेटीन माहेरा आपुल्या ll
सर्व संतांच्या वचनांवर पंढरपूर हे माहेर असल्याने ; ज्याप्रमाणे शिष्याला श्रीगुरु कडे जाताना , पतिव्रतेला सासरी अर्थात स्वगृही जाताना व मुलीला माहेरी जाताना जशी कोणत्याही आमंत्रणाची गरज भासत नाही . अगदी त्याप्रमाणे वारकऱ्यांना पंढरी क्षेत्रात जाताना आमंत्रणाची गरज भासत नाही . म्हणून लाखो वारकरी भाविक दरवर्षी न चुकता पंढरपूरला जातात .
” मस्तक माझे पायावरी l
या वारकरी संतांच्या ll
प्रतिवर्षी पंढरपुरा l
जाती महाद्वारा हरी भेटी ll
कारण ते वारकरी सदैव वारीची आतुरतेने वाट पाहत असतात .
” संपदा सोहळा नावडे मनाला l करिते टकळा पंढरीचा ll
जावे पंढरीशी आवडे मानसी l कधी एकादशी आषाढी हे ll
तुका म्हणे अर्थ ज्याचे मनी l त्याची चक्रपाणी वाट पाहे ll माहेरात आई जशी सासुरवाशी मुलीची आतुरतेने वाट पाहत असते . तसाच आमचा पंढरीनाथ सुद्धा भक्तांची वाट पाहत असतो .
” वाट पाहे उभा भेटीची आवडी l कृपाळू तातडी उतावीळ ll
मुली करीता माहेरा जसा कुठलाही आड पडदा नसतो . मुलगी आली की सरळ मायबापा जवळ जात असते . अगदी त्याप्रमाणे
” पांडुरंग आमचा पिता l
रखुमाई आमची माता ll
असल्यामुळे भक्तांना भगवंताच्या जवळ जाऊन चरण स्पर्शपूर्वक दर्शन घेता येते . अशी व्यवस्था अखिल विश्वात इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही .
तसेच आईला सुद्धा मुलीचे मुखावलोकन केल्याबरोबर तिला सासरी असणाऱ्या सासुरवासाचे लगेच ज्ञान होते . मुलीला त्याचा परिहार द्यावा लागत नाही . त्याप्रमाणे या देवाजवळ सुद्धा परिवाराची आवश्यकता नाही . मागील परिहार पुढे नाही शीण l झालीया दर्शन एक वेळ ll
अंतरीचे गुज जाणे कळवळा l व्यापका सकळा ब्रम्हांडाचा ll अर्थात अंतःकरणात शुद्ध भक्तीचे बीजभूत प्रेम व प्राप्तीची तळमळ किती आहे हे तो जाणतो .
कारण तो ब्रह्मांडात व्यापक आहे आवडे देवाशी तो एका प्रकार l नामाचा उच्चार रात्रंदिन ll तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा l हृदयी कळवळा वैष्णवांचा ll आषाढी कार्तिकी पंढरीची वारी l साधन निर्धारि आण नाही ll भगवंताची आवड शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज आपल्या अभंगाच्या द्वारा शब्दबद्ध करतात . आणि त्याच प्रमाणे वारकरी सुद्धा भगवंताला आवडणारी साधनाच आजन्म करीत असतो . आणि त्याच साधनेची लेखाजोखा भगवत चरणी समर्पित करण्याचा पवित्रतम दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीचे होय. आज आषाढ शुद्ध एकादशी या महावारीच्या पर्व काळावर विदर्भभूच्या कुशीतील दैदिप्यमान ज्ञानसूर्य संत श्री वासुदेवजी महाराज यांचा १४वा पुण्यतिथी महोत्सव पंढरीक्षेत्रात तसेच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी संपन्न होतो आहे त्यानिमित्ताने श्रींच्या चरणी हे वाक् पुष्प समर्पित.

Spread the love
[democracy id="1"]