विरोधकांच्या जत्रेत घुसून अस्तित्व दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न

विरोधकांच्या जत्रेत घुसून अस्तित्व दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न
आम.रणधिर सावरकर यांची घणाघाती टीका

बाळासाहेब नेरकर कडून

राज्यात विरोधकांची ‘वज्रमूठ’ तयार करण्याचा प्रयोग सपशेल फसल्यावर उद्धव ठाकरे विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीत घुसून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकात म्हटले आहे की,पक्ष आणि निवडणूक चिन्हदेखील गमावल्यामुळे संपुष्टात आलेल्या गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी  उद्धव ठाकरे यांनी पुत्र आणि प्रवक्त्यासह थेट पाटण्यात धाव घेऊन राष्ट्रीय राजकारणात लोटांगणे घालण्यास सुरुवात केली आहे. कालपरवापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्राच्या कुंपणातच आवेशपूर्ण गर्जना करणाऱ्या ठाकरे गटाने लोटांगणवादासाठी महाराष्ट्राचा उंबरठा ओलांडून थेट बिहार गाठले, आणि मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, केजरीवाल यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाशी सामना करण्याच्या वल्गनाही केल्या. देशातील सर्व लहानमोठ्या भाजपा विरोधकांसमोर एकाच वेळी गुडघे टेकून बाळासाहेबांच्या विचारास मूठमाती दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी आता सिद्ध केले आहे. आता मेहबूबा मुफ्ती यांचे गोडवे गाण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.
बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा ठेवणाऱ्या कडवट हिंदुत्ववादी सैनिकांना उद्धव ठाकरे यांचा हा लाचार अवतार पाहावा लागणे हे बाळासाहेबांचे दुर्दैव आहे,  असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निष्ठावंतांची फसवणूक करण्यासाठी महाविकास आघाडीचा आधार घेतला. वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आपण मुख्यमंत्री झालो असे सांगत खुर्चीवर बसताच शरद पवारांनी आग्रह केल्यामुळे मुख्यमंत्रीपद घेतले हे सत्य त्यांच्या तोंडून निघाले तेव्हाच फसवणुकीचा पहिला पुरावा स्पष्ट झाला होता. आता महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यावर देशातील विरोधकांचे ऐक्य करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाटण्यात धाव घेतली. पण ज्यांना एका राज्यातील तीन पक्षांचे ऐक्य टिकविता आले नाही, ते आता देशातील सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत हाच मोठा राजकीय विनोद आहे, असे आमदार रणधीर सावरकर म्हणाले. ही ऐक्याची प्रक्रिया नसून संपुष्टात येत असलेले अस्तित्व टिकविण्याची सर्व विरोधी पक्षांची सामूहिक धडपड असून राजकीयदृष्ट्या बुडणारे हे पक्ष एकमेकांना वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला.

Spread the love
[democracy id="1"]