सेवानिवृत्ती नंतर शिक्षकांनी समाजसेवेचा वसा अंगिकारावा.
जि.प.अध्यक्षा संगीताताई अढाऊ यांचे प्रतिपादन
शिक्षक नेते संजय गिऱ्हे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन
हिवरखेड (प्रतिनिधी)
सेवानिवृत्ती नंतर शिक्षकांनी समाजसेवेचा वसा अंगिकारावा. आदर्श समाजव्यवस्था व राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला वाहून घेण्याचे आवाहन अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ यांनी समाजशील जीवन जगणारे शिक्षक संजय गिऱ्हे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलतांना केले.
तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत जि.प.प्राथ शाळा,दिवानझरी येथे कार्यरत असलेले सहायक शिक्षक संजय ज्ञानदेवराव गिऱ्हे हे नियत वयोमानानुसार ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने गावकरी व शाळेच्या वतीने आयोजित निरोप समारंभात जि.प.अध्यक्षा बोलत होत्या.
या कार्यक्रमास जि.प. शिक्षण सभापती माया नाईक, तेल्हारा पंचायत समिती सभापती आम्रपाली गवारगुरु, जि. प. सदस्य प्रमोदिनी कोल्हे, तेल्हारा पंचायत समितीचे माजी सभापती गोपाल कोल्हे, पंचायत समिती सदस्य ईद्रीसभाई, नंदकिशोर अढाऊ, महेंद्र भोपळे, आदिलभाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण सुरत्ने, केंद्रप्रमुख गजानन गायगोळ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, विद्यार्थी पालक व खंडाळा केंद्रातील शिक्षकांनी समाजशील शिक्षक संजय गिऱ्हे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी अतिथी मान्यवरांनी संजय गिऱ्हे यांच्या शैक्षणिक व सामाजिक जगण्याचा भाषणातून गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्रीकृष्ण भड यांनी तर आभार अमोल राखोंडे यांनी मानले. तसेच हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मोहम्मद जाकीर व हनीफिया उर्दू हायस्कूल यांच्या विशेष पुढाकाराने व शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने सुद्धा निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार हे होते तर विशेष अतिथी जेष्ठ लेखिका प्रतिमाताई इंगोले उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती बाबुरावजी खारोडे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, सेवानिवृत्त शिक्षक वा.रा.देऊळकर, ज्ञानदेवराव मोहोड, माजी प्राचार्य दिनकरराव भोपळे, मुख्याध्यापिका रजनी वालोकार , सत्कारमूर्ती संजय गिऱ्हे, सय्यद कासम इमरान, गजानन महल्ले, उषाताई चव्हाण मंचकावर उपस्थित होते. यावेळी विविध समाजिक संघटना, तालुका व शिक्षक जिल्हाभरातून नेते, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, परिसरातील शैक्षणिक संस्था, पत्रकार व गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा संजय गिऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. हनिफिया परिवाराच्यावतीने मुशायरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडोंच्या संख्येने शिक्षक व गावकरी उपस्थित होते. यावेळी सैय्यद कासम इमरान सर लिखित सब्जा-ए-खुद रु या उर्दू पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुलसीदास खिरोडकार व प्रास्ताविक केंद्रप्रमुख मनीष गिऱ्हे यांनी केले तर आभार शिक्षक संघ तालुकाध्यक्ष गोपाल गिऱ्हे यांनी मानले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)