आष्टीमध्ये निवडणुकी अगोदरच घमासान
मग कशी होणार महायुती आणि आजबे, धोंडे, धस यापैकी कोण घेणार माघार
आष्टी/प्रतिनिधी
बीड जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा गेल्या संपूर्ण आठवड्यात घेण्याचा प्रयत्न केला. या सहा मतदासंघामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपला दिलेल्या पाठिंंब्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. खर्या अर्थाने दिवसा घरफोडीचा हा प्रयत्न मानला जातो आहे. कारण पंधरवाड्यापुर्वी एका ताटात खाणारे आज एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. 2024 ची निवडणुक ही कोणालाही सोपी नाही हेच दिसते आहे. महायुती जरी केली असली तरी बंडाळी मोठ्या प्रमाणात माजणार आहे. पाच विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत हेच स्पष्ट झाले आहे. तर आज आपण आष्टी मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. आष्टी मतदारसंघात निवडणुकीअगोदरच घमासान पाहावयास मिळतो आहे. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक हितासाठी असू शकतो परंतु मतदारसंघामध्ये अवघड परिस्थिती बनल्याचे दिसत आहे. आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. परंतु त्यांना आतापासूनच विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी कडवा विरोध केला आहे. तर याच धसांमुळे आजबेंना आमदार होण्याची संधी मिळाली आहे. हे नाकारुन चालणार नाही. निवडणुकीअगोदरच घमासान असल्याने आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघात मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. पाडापाडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात उठाव घेईल हे आताच स्पष्ट होवू लागले आहे.
बीड जिल्हयातील सर्वात शेवटचा मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत काही असलेला भाग यामुळे या मतदारसंघाकडे कायम जिल्ह्याचे लक्ष असते. या मतदारसंघावर माजी आ.भिमराव धोंडे यांचे सर्वाधिक वर्चस्व राहिलेले आहे. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव दरेकर यांनी धोंडेंचा पराभव करत त्यांच्या हुकूमशाहीला लगाम लावण्याचे काम केले. तर 1999 च्या विधानसभा निवडणुकीत स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या शिफारशीवरुन आष्टी मतदारसंघात सुरेश धस हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे अण्णांनी सुरेश धस यांना उमेदवारी देण्याची विनंती लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे केली. त्यानुसार तरुण चेहरा म्हणून धस यांना उमेदवारी दिली आणि विजयीसुद्धा झाले. तेव्हापासून ते 2009 म्हणजे 1999, 2004, 2009 सलग तीनवेळा ते या मतदारसंघाचे आमदार राहिले. 2014 च्या परिवर्तनाच्या लाटेत भिमराव धोंडे यांनी धक्का देत जवळपास 35 हजाराच्या मतांनी विजय संपादन केला. 2019 च्या निवडणुकीत भाजपने व विशेषत: पंकजाताई मुंडे यांनी धोंडे यानांच भाजपची उमेदवारी दिली. त्याठिकाणी आ. सुरेश धस यांना त्यांच्या मुलाला जयदत्त यास उमेदवारी मिळवून द्यायची होती. ती उमेदवारी न मिळाल्याने हताश धस यांनी गेम करत धोंडे यांना पराभूत करण्याच्या भुमिकेतून जिंकणारी आणि विजयाच्या दिशेने निघणारी जागा पराभूत केली. त्याठिकाणी बाळासाहेब आजबे यांना विजयी करण्यासाठी अप्रत्यक्ष ताकद लावल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. ते काही प्रमाणात सत्य असल्याचे सुद्धा सांगण्यात येते. त्यानंतर आमदार धस यांनी विधानपरिषदेच्या माध्यमातून आपले बस्तान बसविले. आता पुन्हा 2024 च्या निवडणुका वर्षभरावर येवून ठेपल्या आहेत. या अगोदरच महाराष्ट्रात मोठी घडामोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुपिक डोक्यातून आली आहे. ज्यातून विरोधकांचा सुपडा साफ करत सर्वांना सोबत घेवून सत्तेचा मलिदा मिळून खाण्याची रणनिती करण्यात आली. परंतु यात भरडला तो सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जी मंडळी एकमेकांच्या ताटात प्रेमाने घास भरवत होती. ती मंडळी एका क्षणात एकमेकांची दुश्मन झाली. सुरुवातीला शिवसेना फोडून शिंदे गटाला सोबत घेतले आणि त्यानंतर 2 जुलै रोजी राष्ट्रवादी फोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेतले. आणि महायुतीचा प्रयोग केला. महायुतीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितरित्या लढविल्या जाणार असल्याचा सुतोवाच केला आहे. परंतु गेल्या चार वर्षापूर्वी जी मंडळी काही मतांनी पराभूत झाली आहे. त्यांनी त्या दिवसापासून जिंकण्यासाठी मोठी तयारी सुरु केली होती. ठरलेल्या रणनितीप्रमाणे विद्यमान आमदार, खासदारांनाच त्याठिकाणी महायुतीच्या वतीने लढविले जाणार आहे. त्यामुळे जे विजयाच्या समीप राहिले किंवा ज्यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली. त्यांना गाशा गुंडाळण्याची किंंवा इतर पर्यायाची वेळ आली आहे. परंतु गेली चार वर्ष पक्षाची धुरा खांद्यावर घेवून जनमाणसात जावून प्रस्थापितांशी संघर्ष करुन ज्यांनी दोन हात केले त्यांच्यावर विरोधकांसोबतच बसण्याची नामुश्की आली आहे. यामुळे कार्यकर्ता वर्ग आणि इच्छुक उमेदवार यांची अडचण वाढली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने तीन दावेदार मानले जातात. ज्यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे, भिमराव धोंडे आणि जयदत्त धस यांचा समावेश आहे. पाटोद्यातून दरवेळी रामकृष्ण बांगर हे निवडणुक लढवित असतात. परंतु आता त्यांचे चिरंजीव बाळा बांगर हे पुढे आले असून ना.धनंजय मुंडे यांच्या विश्वासातील चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी निवडणुक न लढविण्याची घोषणा केलेली आहे. परंतु राजकारणात सर्व काही आलबेल असते असे नाही. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. परंतु त्या ठिकाणी आतापासूनच संघर्ष पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असल्याने आ.सुरेश धस यांची पोटदुखी आहे. त्यामुळे ते आजबेंना मदत करतील का ? हा विषय पटलावर असला तरी त्या ठिकाणी जयदत्त धस हे बंड करतील आणि आजबेंना आव्हान देतील असे राजकीय जाणकारांना वाटते. निवडणुक वर्षावर असली तरी त्याची रणनिती आतापासून ठरली जात आहे. आजबेंच्या विरोधात आ.सुरेश धस यांनी रणशिंग फुंकले असून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर धोंडे बंडखोरी करुन लढले तर आ.सुरेश धस त्यांना मदत करतील कारण भलेही धोंडे यांचे पटणारे नसले तरी आजबेंना घरी बसविण्यासाठी धस कुठल्याही थराला जावू शकतात किंवा जयदत्त धस यांना बंडखोरी करून विजयी करतील व नंतर भाजपात विलीन करतील अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरु आहे. ज्या आजबेंना त्यांनी विजयी केले त्याच आजबेंना घरी बसविण्याची तयारी धस यांनी सुरु केली आहे. धसांच्या मते ज्या खाडेंनी धस यांच्या सर्व देवस्थान आणि वक्फ जमिनीची चौकशी लावली आहे. त्याच्यामागे बाळासाहेब आजबे यांचा हात असल्याचा धस यांचा समज आहे. त्यामुळे हा संघर्ष थांबणारा नक्कीच नाही. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी, पाडापाडी मोठ्या प्रमाणात होईल असे दिसते आहे. भलेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शिवसेना शिंदे गट एकत्र आले असले तरी तळागाळामध्ये कार्यकर्ता हाच महत्वाचा घटक असतो आणि कार्यकर्त्यांच्या मते झालेली महायुती ही बेकायदेशीर आणि अनैसर्गिक असल्याचे सांगत आहेत. येणार्या काळात आणखी घडामोडी घडणार आहेत. त्यावर जिल्हावासियांचे लक्ष असणार आहे.
परमेश्वर गित्ते
संपादक ,दैनिक वार्ता
अंबाजोगाई जि.बीड
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)