अंजनगाव सुर्जी येथील सारडा महाविद्यालयात टीसीएसचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न

अंजनगाव सुर्जी येथील सारडा महाविद्यालयात टीसीएसचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न

ग्रामीण क्षेत्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह

अंजनगाव सुर्जी ता प्रतिनिधी दि.२२

श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथे रविवारी टीसीएस चे युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला. याकरिता मुंबई व नागपूर येथून टीसीएस कंपनीच्या तज्ञ अधिकाऱ्यांची एक पूर्ण टीम महाविद्यालयात आलेली होती. YEP (युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम) अंतर्गत एकूण 98 विद्यार्थ्यांची प्रथम लेखी परीक्षा व नंतर मुलाखत घेण्यात आली यापैकी एकूण 49 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात आले.या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सारडा महाविद्यालया सोबतच पी. आर. पोटे फार्मसी महाविद्यालय, अमरावतीचे 71 व केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचे 16 विद्यार्थी सुद्धा सहभागी होते.टीसीएस ही कंपनी युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षणातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना व नुकतेच पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देते. सारडा महाविद्यालयात जानेवारी महिन्यात टीसीएस चे अनुभवी व तज्ञ ट्रेनर श्री अशोक रामनानी, पुणे यांनी विद्यार्थ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले होते.मागील पाच महिन्यांपासून टीसीएस चे प्रशिक्षण वर्ग व कॅम्पस ड्राईव्हचे महाविद्यालयात आयोजन करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिवस-रात्र मेहनत केली. अंजनगाव सुर्जी सारख्या ग्रामीण क्षेत्रातील महाविद्यालयात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले. या प्लेसमेंट ड्राईव्ह करिता महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान लाभले. या प्लेसमेंट ड्राईव्हमुळे अंजनगाव सुर्जी परिसरातील विद्यार्थ्यांना प्रचंड प्रेरणा मिळेल व बेरोजगारीची भीषण समस्या सोडवण्यास मदत मिळेल.

Spread the love
[democracy id="1"]